“पुस्तक अजून संपलेले नाही; पुढची पाने आपण लिहायची आहेत,”__प्रा. संजय इंगळे
| सांगावा न्यूज | लोणावळा, दिनांक १६ ऑगस्ट २०२६ : सोबर लाईफ व्यसनमुक्ती केंद्र, लोणावळा येथे व्यसनमुक्त होण्यासाठी आलेल्या व्यक्तींसाठी प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन संपन्न झाले. गुरुवार दिनांक १३ ऑगस्ट रोजी सामाजिक कार्यकर्ते अमित सुवासे यांनी मार्गदर्शन केले. सोबर लाईफ चे संचालक प्रा. संजय इंगळे यांनी व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी सुरू केलेल्या लोणावळ येथील सेंटर मध्ये विविध प्रबोधनात्मक आणि जाणीव जागृतीचे कार्यक्रम आयोजित केले जातात त्या अनुषंगाने घेतलेल्या या कार्यक्रमात उपस्थितांमध्ये उत्साह दिसून आला. “तुम्ही तुमची चूक नाही, तुम्ही तुमचा भूतकाळ नाही; तुमच्यात अजूनही सुंदर उद्याचा दिवस जिवंत आहे,” असा आशावादी संदेश देत व्यसनमुक्तीच्या मार्गावर असलेल्या व्यक्तींना आत्मविश्वास आणि नव्या सुरुवातीची प्रेरणा श्री सुवासे यांनी दिली.
अमित सुवासे पुढे म्हणाले की, मित्र संजय इंगळे यांच्या निमंत्रणावरून आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मलाही समाजासाठी विचार रुपी योगदान देता येत असल्याचे समाधान वाटत आहे. व्यसन ही व्यक्तीची ओळख नसून अनेकदा मानसिक वेदना, ताण, एकटेपणा, चुकीची संगत किंवा जीवनातील अडचणींपासून पळण्याचा मार्ग बनतो. सुरुवातीला पदार्थाचा वापर करणारी व्यक्ती हळूहळू त्याच्या नियंत्रणाखाली जाते; मात्र योग्य प्रयत्न, उपचार, समुपदेशन आणि कुटुंबाच्या सहकार्याने पुन्हा आयुष्याची सूत्रे स्वतःच्या हातात घेता येतात. ही आयुष्याची सुंदर सूत्रे हातात घेण्याची आणि ती अंदाज पार पाडण्याची ताकद तुमच्यात यावी म्हणूनच सोबर लाईफ व्यसनमुक्ती केंद्र आणि प्रा. संजय इंगळे प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या आणि तुमच्या प्रयत्नांना शंभर टक्के यशयेणार आहे अशी खात्री आहे. “चुका स्वीकारा, पण स्वतःचा तिरस्कार करू नका. जबाबदारी घ्या आणि स्वतःला पुन्हा उभे राहण्याची संधी द्या,” कुटुंबाचा गमावलेला विश्वास केवळ शब्दांनी नव्हे, तर सातत्यपूर्ण कृतीने पुन्हा मिळवता येतो,
व्यसनमुक्ती म्हणजे केवळ दारू किंवा अमली पदार्थ सोडणे नव्हे, तर व्यसनामागील मानसिक कारणांवरही काम करणे आवश्यक आहे. पुन्हा व्यसनाची इच्छा निर्माण झाल्यास ती लपवण्याऐवजी तातडीने counsellor, डॉक्टर किंवा संबंधित समुपदेशकांच्या सानिध्यात येऊन संवाद साधणे गरजेचं आहे. तो सुसंवाद घडविण्यासाठी तिन्ही इथे आला आहात, आता स्वतः ला घडवा. असे मोलाचे मार्गदर्शन अमित सुवासे यांनी केले.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा