एस टी बस चा मार्ग मनाने बदलला ! सध्या रस्ता सुरळीत असताना सुद्धा मूळ मार्गावरून बस जात नाहीत !
पूर्वीप्रमाणे औंध मार्गे काळेवाडी फाटा - डांगे चौकातून चिंचवडकडे जाणाऱ्या मूळ मार्गावरून बस चालू करण्याची प्रवाशांची मागणी
| सांगावा न्यूज | पुणे ( पिंपरी चिंचवड ), दिनांक २४ : धाराशिव जिल्ह्यातील भूम - वाशी आणि परांडा तालुक्यातील नागरिक पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात स्थायिक झाले आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील खास करून सांगावी, थेरगाव, चिंचवड, निगडी, अजिंठानगर या मार्गावर आणि मार्गाच्या जवळपास भूम - वाशी आणि परांडा तालुक्यातील लोकसंख्या जास्त असल्याने पूर्वीपासून भूम वरून पुणे पिंपरी चिंचवड कडे येणाऱ्या बस या औंध मार्गे पुढे सांगावी फाटा - काळेवाडी फाटा ( थेरगाव ) - डांगे चौक चिंचवड - अजिंठानगर या मार्गावरून बस चालू होत्या आणि हाच मार्ग प्रवाशांच्या सोयीचा आहे. परंतु ट्रॅफिकचे आणि मेट्रो कामाची कारणे दाखवून मुद्दामहून ड्रायव्हर आणि कंडक्टर शॉर्ट कट मारून शिवाजीनगर वरून थेट दापोडी मार्गे वल्हभनगर डेपोत एस टी बस घेऊन जातात. त्यामुळे प्रवाशांना वल्हभनगरला उतरल्या नंतर आपल्या इच्छित ठिकाणी जाण्यासाठी पुन्हा रिक्षाला २००/- रुपये देवून घरी जावे लागते. परिणामी प्रवाशांचे आर्थिक नुकसान होते. वृद्ध व्यक्ती तर भूम ते पिंपरी चिंचवड मोफत येतात पण इथे केवळ घरी पोहचण्यासाठी रिक्षासाठी दोनशे ते तीनशे रुपये मोजावे लागतात. शिवाय इथे उतरून घरी जाण्यासाठी दुचाकी किंवा इतर वाहनांचा आधार घेतांना प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. चुकीचा मार्ग शिवाजीनगर, खडकी, दापोडी, फुगेवाडी ते वल्हभनगर या मार्गावर बस मार्गक्रमण करतात पण या मार्गाचा बहुसंख्य प्रवाशांना उपयोग होत नाही. आता जो मूळ मार्ग आहे औंध मार्गे पुढे सांगावी फाटा - काळेवाडी फाटा ( थेरगाव ) - डांगे चौक चिंचवड - अजिंठानगर या मार्गावर कुठलेच मेट्रो चे काम चालू नाही किंवा जो विद्यापीठ गेट तिथपर्यंत मेट्रो काम चालू होते ते देखील सुरळीत झाले आहे. त्यामुळे या मार्गावरून एस टी बस यायला काहीच अडचण नाही. आश्चर्य म्हणजे भूम कडे जाताना बस याच मार्गाने जातात ! पण पिंपरी चिंचवड शहरात येतांना मात्र या मार्गावरून न जाता दुसऱ्या मार्गाने जाऊन प्रवाशांना वाऱ्यावर सोडले जाते हा विरोधाभास आहे. शिवाय भूम कडून पिंपरी चिंचवड शहराकडे येणाऱ्या खाजगी लक्झरी बस मात्र औंध मार्गे पुढे सांगावी फाटा - काळेवाडी फाटा ( थेरगाव ) - डांगे चौक चिंचवड - अजिंठानगर अशा जातात. तसेच पी एम पी एम एल च्या सिटी बस देखील शंभर शंभर प्रवाशांना घेऊन याच मार्गावर ये जा करतात मग भूम आणि परांडा आगार कर्मचारी ट्रॅफिक चे कारण देऊन कामचुकारपाना का करीत आहेत हा गंभीर प्रश्न आहे ?
भूम आगार एस टी डेपो मॅनेजर , ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना चांगले माहीत आहे की पिंपरी चिंचवड वरून भूम कडे जाताना नेहमीच्या मूळ मार्गाने म्हणजेच अजिंठानगर चिंचवड डांगे चौक काळेवाडी फाटा सांगावी फाटा औंध मार्गे बस गेली तरच प्रवासी मिळतात आणि आसन क्षमता पूर्ण होते. तर मग भूम वरून पिंपरी चिंचवड शहरात येतांना, शिवाजी नगर वरून शॉर्ट कट मारून थेट वल्हभनगरला बस का घेऊन जातात हा गंभीर प्रश्न आहे. अशा प्रकारे प्रवाशांना योग्य मार्गाने न सोडता प्रवाशांची हेळसांड करून त्यांना अडचणीत टाकण्यामध्ये भूम आगार एस टी डेपो मॅनेजरचे काय हित आहे का हे खात्यांतर्गत चौकशी करून तपासले पाहिजे अशी मागणी प्रवासी करीत आहेत. येत्या दोन दिवसात भूम कडून पिंपरी चिंचवड शहराकडे येणाऱ्या एस टी बस मूळ मार्गावरून म्हणजेच औंध मार्गे पुढे सांगावी फाटा - काळेवाडी फाटा ( थेरगाव ) - डांगे चौक चिंचवड - अजिंठानगर आणि मग शेवटी वल्हभनगर अशी सुरू झाली नाही तर प्रवासी आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. सांगावा न्यूज च्या माध्यमातून प्रवासी संघटना प्रवाशांना आवाहन करीत आहे की, आपण भूम मधून एस टी बस मध्ये बसताना कंडक्टर आणि ड्रायव्हर यांना विचारा की जर पूर्वीच्या मूळ मार्गाने बस जाणार असेल तरच आम्ही बस मध्ये बसतो अन्यथा एस टी बस मध्ये बसणार नाही असे ठणकावून सांगावे.
मराठवाडा - पुणे प्रवासी संघटनेच्या वतीने भूम आणि परांडा डेपो मॅनेजेरला विनंती आहे की पूर्वीचा जो मार्ग आहे औंध मार्गे पुढे सांगावी फाटा - काळेवाडी फाटा ( थेरगाव ) - डांगे चौक चिंचवड - अजिंठानगर याच मार्गावरून एस टी बस मार्गक्रमण कराव्यात ज्यामुळे प्रवाशांची सोय होईल.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा