| सांगावा न्यूज | पुणे, दिनांक १४ : पुण्यातील हडपसर परिसरातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या गंभीर आरोपाखाली अटक झालेल्या आकाश सिद्धप्पा ढोणे(वय २४, रा. हडपसर) या तरुणाला, अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामिन मंजूर केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी आकाश ढोणे याने १६ ऑगस्ट २०२५ आणि २६ ऑगस्ट २०२४ रोजी अल्पवयीन पीडितेला आपल्या घरी बोलावून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले आणि ही बाब कुणालाही सांगितल्यास धमकी दिली. पीडितेने ही घटना आईला सांगितल्यानंतर, तब्बल तीन महिन्यांनी – १६ नोव्हेंबर २०२५ रोजी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा भा.न्या.सं. २०२३ चे कलम ६४(१), ७५(१) सह २५१(२) तसेच पोक्सो कायदा कलम ४, ६, ८, १२ अंतर्गत नोंदविण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे १७ नोव्हेंबर २०२४ रोजी पीडितेची वैद्यकीय तपासणी झाली, ज्यात घटनेला दुजोरा मिळाल्याचे अहवालात नमूद आहे. त्याच दिवशी आरोपीला अटक करण्यात आली.
आरोपीचे वकिल ॲड गणेश म्हस्के पाटील यांनी युक्तीवाद करताना सांगितले की, आरोपी निर्दोष असून त्याला खोट्या गुन्ह्यात अडकविण्यात आले आहे. तपास पूर्ण झाला असून चार्जशीट दाखल झाली आहे. आरोपी सात महिन्यांपासून तुरुंगात आहे, त्यामुळे जामिनावर सुटका करावी. तर सरकारी वकील आणि तपासी अधिकाऱ्यांनी जामिनाला तीव्र विरोध केला. त्यांनी सांगितले की, पीडित अल्पवयीन आहे आणि वैद्यकीय पुरावा आरोपांची पुष्टी करतो. आरोपी सुटल्यास तो पीडित व तिच्या कुटुंबियांवर दबाव आणू शकतो.
न्यायालयाने निरीक्षण नोंदविले की गुन्ह्याची तक्रार घटनेनंतर ३ महिन्यांनी दाखल झाली आहे. आरोपी १७ नोव्हेंबर २०२४ पासून तुरुंगात असून तपास पूर्ण झाला आहे. पुढील कोणतीही जप्ती किंवा शोधकार्य बाकी नाही. त्यामुळे आरोपीला जामिन मंजूर करण्यात येत आहे; हा आदेश मा. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. नशिककर यांनी पारित केला आहे.आरोपीच्या वतीने ॲड गणेश म्हस्के पाटील व सहाय्यक म्हणुन ॲड गुलनाझ पठाण व शुभम फडतरे यांनी काम पाहीले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा