देवाभाऊ पोस्टर मुळे शिवप्रतीमेची विटंबना : मराठा क्रांती मोर्चा
| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक २० : छत्रपती शिवाजी महाराज त्यांची राजमुद्रा सोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देवा भाऊ उल्लेख असलेले पोस्टर महाराष्ट्रात सर्वत्र पुणे शहर पिंपरी चिंचवड शहरात विनापरवाना लावलेले आहेत. काही पोस्टरवर पावसामुळे चिखलाचे पाणी, चिखल उडालेला आहे तसेच काही पोस्टरवर गुटखा पान खाऊन पिचकारी मारल्याचे आढळून आले आहे. या प्रकारामुळे महाराष्ट्राचे आराध्य दैवत युगप्रवर्तक कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची विटंबना झाल्यामुळे मराठा क्रांती मोर्चा सह शिवप्रेमी संतप्त झाले आहेत. पिंपरी चिंचवड शहरात गुन्हा दाखल झाला आहे परंतु अद्याप विनापरवाना पोस्टर लावणाऱ्यांवर कारवाई झालेली नाही. आज शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार हे जनसंवाद कार्यक्रमासाठी आले होते यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाने अजित पवार यांची भेट घेऊन निवेदन देऊन देवा भाऊ पोस्टर प्रकरणी तक्रार केली तसेच संतप्त भावना व्यक्त केल्या. संपूर्ण महाराष्ट्रातील अयोग्य जागेवरील पोस्टर काढून टाकावीत. विनापरवाना पोस्टर लावणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. यावेळी शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्र्यांना छत्रपती शिवरायांचा अवमान झालेले पोस्टरचे फोटो देखील दाखवले. या प्रकरणाची व्यवस्थित माहिती दिल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याप्रकरणी लक्ष घालून योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले. या शिष्टमंडळात मराठा क्रांती मोर्चाचे सतीश काळे, वैभव जाधव, प्रकाश जाधव, नकुल भोईर यांचा समावेश होता.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा