पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासून अशी जाहिरात करणारे आणि महाराजांची प्रतिमा असलेल्या स्टिकरवर अपमानास्पद कृत्य करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी
| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक १८ : मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांचे मुंबई येथील आंदोलन यशस्वी झाल्यानंतर पिंपरी चिंचवड शहरासह महाराष्ट्रातील इतरही भागात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर लीन होऊन उभे आहेत असे स्टिकर्स, पोस्टर्स, फ्लेक्स प्रदर्शित करण्यात आले. पिंपरी चिंचवड शहरातील सार्वजनिक ठिकाणी, रस्त्याच्या कडेला भिंतींवर काही दुभाजकाच्या बाजूला असे स्टिकर्स लावले गेले. हे कोणी लावले ते अज्ञात आहे. लोकांमध्ये अशी चर्चा आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा आरक्षणाचे श्रेय घेण्यासाठी असे करीत असावेत किंवा फडणविसांचे कार्यकर्ते उत्साहपोटी देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा छत्रपती शिवाजी महाराजांसोबत लावत असावेत. असे पोस्टर लावले त्याबद्दल काही नाही परंतु काही पोस्टर्स चुकीच्या ठिकाणी लावल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेवर काही लोकांनी गुटखा खाऊन थुंकल्याचे निदर्शनास आले असे छावा मराठा महासंघाचे संस्थापक धनाजी येळकर पाटील यांनी सांगितले. काही ठिकाणी वाहनांच्या चाकांमुळे रस्त्यावरील पाणी आणि चिखल छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेवर जात आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना होत असल्याची भावना शिवप्रेमी आणि महाराजांच्या अनुयायांनी व्यक्त करून तीव्र प्रतिक्रिया दिल्या. आज दिनांक १८ सप्टेंबर रोजी शहरातील पिंपळे सौदागर जवळील जगाताव डेअरी अंतर्गत भुयारी मार्गात ज्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आणि छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा एकत्र लावली होती त्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेवर गुटखा खाऊन थुंकल्याचे जेव्हा नागरिकांच्या निदर्शनास आले तेव्हा लगचे मराठा छावा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या याच स्टिकर मधील प्रतिमेस दुग्धभिषेक करून स्वच्छ करण्यात आले. अशा ठिकाणी स्टिकर लावणारे आणि अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा अवमान करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही गुन्हा दाखल करावा अशी देखील मागणी छावा मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी केली. शेवटी आज काळेवाडी पोलिस स्टेशन मध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती छावा मराठा महासंघाचे संस्थापक धनाजी येळकर पाटील यांनी सांगावा न्यूज ला दिली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा