Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

शनिवार, २३ ऑगस्ट, २०२५

पिंपरी चिंचवड कलाकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

गीत - संगीत - नृत्य - काव्य - पारंपरिक - गोंधळ या कलात्मक मेजवानीमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन होणार गौरव

| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक २३ : पिंपरी चिंचवड कलाकार संघाच्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. रविवारी (दि. २४) पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृह येथे आयोजित वर्धापन दिन कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती पिंपरी चिंचवड कलाकार संघाचे अध्यक्ष विजयकुमार उलपे यांनी दिली.
        ज्येष्ठ नाट्य अभिनेते सुनील गोडबोले यांना जीवनगौरव पुरस्कार, माजी आमदार विलास लांडे यांना समाजभूषण पुरस्कार, रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांना समाजरत्न, सामाजिक कार्यकर्ते सईदभाई इनामदार यांना समाज गौरव, स्वरांजली मंचाचे अध्यक्ष प्रकाश डोळस व उद्योगपती जोहरभाई चुनावाला यांना कलामित्र पुरस्कार, अभिनेत्री डॉ. रूपाली जगताप पाटील यांना सौंदर्य कलादर्पण पूरस्कार, लोकशाहीर बापू पवार यांना शाहिरी कला गौरव पूरस्कार, ज्येष्ठ तमाशा कलावंत लताताई विरळीकर व मुन्नाभाई जुन्नरकर यांना लोकनाट्य तमाशा कला गौरव पुरस्कार, राजन जांभळे यांना वृक्षमित्र पुरस्कार, कैलास दुधाळे यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच कला क्षेत्रातील २५ कलाकारांना कलागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
        या कार्यक्रमास विधानसभेचे उपसभापती अण्णा बनसोडे, आमदार शंकर जगताप, माजीआमदार दिलीप मोहिते, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, उद्योजक रामचंद्र उर्फ तात्यासाहेब कड, बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र राज्य  प्रभारी डॉ. हुलगेश चलवादी, महापालिकेचे उपायुक्त अण्णा बोदडे, माजी महापौर माई ढोरे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, शशिकांत कदम, अंबरनाथ कांबळे, शाम जगताप, बालगंधर्व परिवार ट्रस्टचे खजिनदार अनिल गुंजाळ आदी उपस्थित राहणार आहेत.
         ज्येष्ठ अभिनेते वसंतराव अवसरीकर, जेष्ठ नृत्यदिग्दर्शक प्रदीप खाडे यांच्या हस्ते रंगमंच पूजन होऊन, प्रसिद्ध अभिनेत्री नृत्यांगना पूजा गुंजाळ यांची गणेश वंदना सकाळी ९.३० वाजता संपन्न होईल. त्यानंतर सचिन काटे, राजू गरुड हे पारंपरिक जागरण गोंधळ सादर करतील. शालेय विद्यार्थ्यांसाठी जगप्रसिद्ध जादूगार अनिकेत, जादूगार रघुराज यांचे जादूचे प्रयोग, हिंदी मराठी गाण्यांचा कराओके संगीत नजराना, महाराष्ट्राची लोकधारा नृत्य कलाविष्कार सँडी आणि रवी सादर करतील. त्यानंतर कवी शाहीर अब्दुल मुलानी यांचे काव्यवाचन, गायक चंद्रकांत प्रल्हाद शिंदे लोकगीते सादर करणार आहे. संगीतकार गायक साजन विशाल, राघू राहुल शिंदे, संकल्प गोळे, अमर पुणेकर, स्वप्निल पवार व इतर गायक लोकगीते सादर करतील. नृत्यदिग्दर्शक सतीश सातारकर हे छत्रपती शिववंदना सादर करतील.
        सायंकाळी पाच वाजता पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न होणार आहे. त्यानंतर हिंदी मराठी गीतांची संगीत रजनी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे  कलाकार सादर करतील. तर रात्री ८ वाजता लावण्यवती आरती पुणेकर, माया पुणेकर, पूजा सिंधिया लावणी साजरी करतील. 
        हे सर्व कार्यक्रम रसिकांसाठी मोफत असणार आहेत. या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी रसिकांनी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन विजयकुमार उलपे आणि सचिव व प्रवक्ते चित्रसेन भवार यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फॉलोअर