| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक १५ : बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी पिंपरी चिंचवड शहरातील वाकड येथे काल दिनांक १४ सप्टेंबर रोजी समाजाची बैठक पार पडली. या बैठकीला मार्गदर्शन उद्योजक संतोष पवार आणि उद्योजक राजाभाऊ चव्हाण यांनी केले.
मराठा समाजाला हैद्राबाद गॅझेटनुसार आरक्षण मिळाले असल्याने बंजारा समाजालाही ऐतिहासिकदृष्ट्या अन्याय होऊ नये, अशी भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली. निजामशाही काळात बंजारा समाज अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गात होता. त्यामुळे महाराष्ट्रातही त्यांना ST आरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणी या बैठकीत झाली.
बैठकीत ठरविण्यात आले की आंदोलन पूर्णपणे शांततेत होईल. कोणताही गाजावाजा न करता, बंजारा संस्कृती आणि परंपरा जोपासत समाजाची एकजूट दाखवली जाईल. “आरक्षण मिळवण्यासाठी मतभेद, संघटना, पक्ष यांना बाजूला ठेवून समाज नागरिक म्हणून एकत्र आला पाहिजे,” असे नेत्यांनी आवाहन केले.
याप्रसंगी १८ ऑक्टोबर २०२५ रोजी मोठ्या आंदोलनाची घोषणा करण्यात आली. हे आंदोलन वसंतराव नाईक पुतळा (येरवडा) येथून सुरू होऊन शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार अर्पण करून जिल्हाधिकारी कार्यालयावर संपन्न होईल.
बैठकीला सुमारे ५०० सुशिक्षित उद्योजक व बंजारा बांधव उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा